समुद्रगुप्त

समुद्रगुप्त (Samudragupt)

समुद्रगुप्त : (इ.स. ३२० ‒ ३९६). गुप्त वंशातील सर्वश्रेष्ठ राजा म्हणून समुद्रगुप्त ओळखला जातो. पहिला चंद्रगुप्त व त्याची लिच्छवी राणी कुमारदेवी यांचा तो पुत्र होय. पाश्चिमात्य इतिहासकार ‘इंडियन नेपोलियन’ असा त्याचा उल्लेख करतात. काही इतिहासकारांच्या मते त्याचे मूळ नाव कच असे होते आणि समुद्रगुप्त हे नामाभिदान त्याने सिंहासनावर आल्यावर धारण केले. पहिल्या चंद्रगुप्ताने आपल्या अंतकाळी दरबार भरवून पुत्र समुद्रगुप्तास आपला उत्तराधिकारी नेमले होते. त्यानुसार तो गुप्तांच्या गादीवर आला. सत्तेवर येताच समुद्रगुप्ताने राज्यविस्ताराचे कार्य हाती घेतले. त्या वेळी संपूर्ण उत्तर भारत छोट्या राज्यांमधे विखुरला गेला होता. काही गणराज्ये होती, तर काहींमध्ये राजसत्ता होती. परकीय आक्रमणाचा धोका होताच. समुद्रगुप्ताने नागांचे राज्य प्रथम जिंकून घेतले. त्यानंतर पाटलिपुत्र जिंकून घेऊन संपूर्ण मगध राज्य आपल्या राज्यात सामील करून घेतले. मगध राज्याच्या भोवती असलेल्या आठ छोट्या राज्यांनी समुद्रगुप्ताविरुद्ध एकत्र फळी उभारली. समुद्रगुप्ताने त्या सर्व राजांचा पराभव करून ती राज्ये आपल्या राज्यात समाविष्ट केली. त्यानंतर त्याने जबलपूर आणि छोटा नागपूर यांच्या परिसरातील १८ छोट्या राजांविरुद्ध लढाया करून ती राज्ये जिंकून घेतली. त्या राजांना त्यांचे राज्य परत करून मांडलिकत्व स्वीकारावयास लावले. समुद्रगुप्ताची सत्ता बुंदेलखंड, उत्तर प्रदेश, बिहार, बंगालचा काही भाग, मध्य भारतभर पसरली. तसेच आसाम, बंगाल आणि नेपाळ या राज्यांच्या राजांना त्याने मांडलिकत्व स्वीकारावयास भाग पाडले. त्यानंतर त्याने आपला मोर्चा दक्षिण भारताकडे वळवला. दक्षिणेत त्या वेळी १४ छोटी राज्ये होती. या राजांनी कांचीच्या विष्णुगुप्त राजाच्या नेतृत्वाखाली एकत्र फळी उभारली. समुद्रगुप्ताने अत्यंत कुशलतेने आपल्या सैन्याची व्यूहरचना करून या राजांचा पराभव केला. या विजयामुळे दक्षिण पठारावरील विलासपूर, रायपूर, संबळपूर, खानदेश हे प्रदेश गुप्त साम्राज्याच्या आधिपत्याखाली आले. पराभूत झालेल्या राजांना मांडलिकत्व स्वीकारायला लावून समुद्रगुप्ताने त्यांच्या राज्याचा बहुतेक भाग त्यांनाच सोपवून स्वायत्तता बहाल केली.

साम्राज्यात शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्य ठेवण्याच्या दृष्टीने समुद्रगुप्ताने सीमावर्ती राज्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. त्यांतील काही राजांनी लढाई न करता त्याचे मांडलिकत्व स्वीकारले. त्यामुळे, मालव, अजमेर, भरतपूर, सियालकोट, झांशी इत्यादी राज्यांवर त्याचे वर्चस्व स्थापित झाले. त्याच्या मुत्सद्दीपणामुळे भारतसमीप द्वीपसमूहांच्या राज्यांशी गुप्त साम्राज्याचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊ शकले. त्याच्या पराक्रम व विजश्रीची वार्ता एकूण सिंहलद्वीपासारखा अनेक द्वीपांच्या अधिपतींनी त्याचे मांडलिकत्व मान्य केले. त्याच्या राज्यातील शासन सुनियोजित होते आणि प्रजा सुखी होती. समुद्रगुप्ताच्या राज्यकारभाराचा पगडा आणि धार्मिक प्रभाव या सर्व विदेशी राज्यांत पसरला. जरी सम्राट अशोकाचे साम्राज्य भौगोलिक मानाने जास्त विस्तृत होते, तरी समुद्रगुप्ताचा दबदबा परदेशापर्यंत पोचला होता. पराक्रमी, शूर व मुत्सद्दी सेनानी, राजकीय व्यवहारनिपुण शासक आणि सत्शील व विद्वान राजा म्हणून समुद्रगुप्त ओळखला जातो. म्हणूनच त्याला इतिहासात उल्लेखनीय राजकीय आणि सामरिक श्रेष्ठत्व प्राप्त झाले. समुद्रगुप्ताचा राज्यकाळाला प्राचीन इतिहासांतील सुवर्णकाळाचा आरंभ मानतात.

समुद्रगुप्ताने हरिषेणनामक परराष्ट्र मंत्र्याच्या करवी आपल्या विजयाची प्रशस्ती तयार करवून ती कौशाम्बी येथील अशोकाच्या शिलास्तंभावर कोरविली. त्यावरून त्याच्या लढायांची कल्पना येते. हरिषेण प्रयाग प्रशस्तीमध्ये त्याच्या पराक्रमाविषयी ‘समरशतावरणदक्ष’ (शेकडो रणांगणामध्ये युद्ध करण्यात दक्ष) असे म्हणतो. त्याने ‘पराक्रमाङ्क’ किंवा ‘विक्रमांक’ अशी सार्थ पदवी धारण केली होती.

संदर्भ :

  • Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1998.
  • Thaper, Romila, History of India, vol.1, New Delhi, 1966.
  • कदम, य. ना. समग्र भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००३.

समीक्षक – सु. र. देशपांडे

अशोक सम्राट (Ashoka Emperor)
  • 177,455 अभ्यागत

Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग