नाशिक-भडोच व्यापारी मार्गांवरील वारसा जपण्याची गरज

सावळ घाटात प्राचीन पाणपोईचे दर्शन!
 | Updated: 22 Aug 2019, 04:00:00 AM

नाशिक-भडोच व्यापारी मार्गांवरील वारसा जपण्याची गरज rameshpadwal@timesgroup...

सावळ घाटात प्राचीन पाणपोईचे दर्शन!

नाशिक-भडोच व्यापारी मार्गांवरील वारसा जपण्याची गरज

ramesh.padwal@timesgroup.com

@MTramesh

नाशिक : प्राचीनकाळात नाशिकहून भडोच या बंदराच्या शहराकडे जाण्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर व्हायच्या याच्या खाणाखुणा आता मिळू लागल्या आहेत. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भडोच बंदराला जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गांवर यात्रेकरूंसाठी बनविलेली पाणपोई (पोढी) प्रकाशात आली असून, पेठ रस्त्यावरील सावळ घाटात ही पाणपोई आजही इतिहास उलगडताना दिसते. ही पाणपोई दुर्लक्षित मात्र, आजही सुस्थितीत असून, प्राचीन संदर्भ सांगणारी असल्याने तिचे जतनही करण्याची गरज आहे.

मौर्य व त्यानंतरच्या सातवाहनकालिन महाराष्ट्रात गोवर्धन (नाशिक), पैठण, तगर व जुन्नर अशा महत्त्वाच्या व्यापारी पेठा उदयास आल्या होत्या. नालासोपारा व भडोच बंदरात उतरलेला परदेशी माल हा या व्यापारी पेठांमध्ये येत असे. ज्या हमरस्त्यांवरून दळणवळण होत असे त्या मार्गावर लेणी खोदल्याचे दिसते. आज दळणवळणाचे मार्ग बदलले असले तरी प्राचीन मार्गांवर व्यापारी मार्गांच्या खाणाखुणा आजही पहायला मिळतात. अशीच भडोच ते नाशिक या प्राचीन व्यापारी मार्गावरील सावळ घाटात ये-जा करणारे भिक्षुक, व्यापारी व त्यांच्या जनावरांसाठी दगडात कोरलेली पाणपोई पहायला मिळते. 'ही पाणपोई नहापान काळात झाली असावी. सार्थवाहमध्ये नहापान काळात भडोच बंदराला महत्त्व आल्याचा उल्लेख असून, नहापानाने पोढ्या बांधल्याचेही यात म्हटले आहे, असे प्राचीन लेणी व नाण्याचे अभ्यासक चेतन राजापूरकर व छायाचित्रकार उमेशकुमार नागरे सांगतात. सावळघाट प्राचीन घाट असून, तो आजही वापरला जातो आहे. याच घाटाच्या मध्यावर ही पाणपोई (सार्थवाहमध्ये याचा उल्लेख जलद्रोई म्हणजेच पोढी असा आहे.) आजही आपला इतिहास सांगताना दिसते.

'पोढ्या साधारण दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे पिण्याचे पाणी (पाणपोढ्या) साठविण्यासाठी दुसरे म्हणजे आंघोळ व इतर वापरासाठी. पाणपोढ्या हीनयान टप्प्याच्या सुरुवातीच्या काळातील म्हणजे साधारण इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. पहिले शतक असावा. याची मूळ संकल्पना टेकडीवरून वाहणारे पावसाचे पाणी गोळा करण्याची होती. तर नंतरच्या काळात पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी आणि टाकीत पडण्याचा धोका टाळण्यासाठी इ. स. च्या दुसऱ्या शतकात विकसित झाला,' असे मत एस. नागराजू यांनी बुद्धिस्ट आर्किटेक्चर ऑफ वेस्टर्न इंडिया या पुस्तकात नोंदविले आहे. मात्र, सावळ घाटात मिळालेली पोढीचा वापर एकाच वेळी दोन्ही गोष्टींसाठी होत असल्याचे दिसते. म्हणजे पिण्याचे पाणी व त्यासोबतच जनावरांना पाणी पिता यावे याचीही सोय येथे पहायला मिळते.

... अशी आहे पोढी

पोढीचा आकार अकरा बाय पंधरा फूट आहे. पोढीचे पाच भाग असून, यातील तीन जनावरांसाठी आहेत. तर दोन बंदिस्त प्रकारातील आहेत. मात्र, कालांतराने त्यावरील काही दगडी छप्पर कोसळले आहे. ही पोढी नाशिकच्या इतिहासातील व्यापारी महत्त्व स्पष्ट करणारी असल्याने पुरातत्त्वीय विभागाने ती जपण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी मागणी राजापूरकर व नागरे यांनी केली आहे.


Comments

Popular posts from this blog

महार

चांभारानी गणपती शिवल्या मुळे गणपती बाटला. म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...!☝

मांग