चक्रवर्ती अशोक सम्राट (कलर्स मालीका)
चक्रवर्ती अशोक सम्राट (कलर्स मालीका)
Primary tabs
सध्या कलर्स नावाच्या दूरचित्रवाणीवर चक्रवर्ती अशोक सम्राट (टेक्स्ट अपडेट) नावाची धारावाहीक मालीका चालू आहे. (मी स्वतः दूरचित्रवाणी मालीकांचा फारसा पंखा नाही तरीही गेल्या चार एक महिन्यांपासून हि मालीका पाहतो आहे).
मालीकेत
कुमार वयातील अशोक एका चतुर आणि गुणी युवकाच्या रुपात उभा केला गेला आहे
कुमार अशोकची आई सुद्धा जीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी अशी आदर्श माता दाखवली आहे.
आचार्य चाणक्य मगध साम्राज्याचे पितामह आणि सशक्त मार्गदर्शक स्वरूपात दाखवले आहेत.
सध्या पाटलीपुत्र (पाटना) नगरीत अशोकाचे पिता बिंदुसार आणि राजघराण्यास कुमार अशोक एका मोठ्या कटकारस्थानातून वाचवतो आणि ते कटकारस्थान उघडकीस येण्याचे प्रसंग सध्या दाखवले जात आहेत.
एकुण प्रसंगाचे सादरीकरण रोचक आहे. सम्राट बिंदुसारची त्याची पत्नी धर्मा आणि कुमार अशोक यांच्या पासून ताटातूट झालेली होती पण राजघराण्यातील कट कारस्थानांमुळे आचार्य चाणक्यांनी सम्राट बिंदुसारना कुमार अशोक त्यांचा मुलगा आहे हे अद्याप (हे लिही पर्यंत) सांगीतलेले नाही
आणि राणी धर्मा बाकी राजघराण्यास न सांगता दासीरुपात पण सम्राट बिंदुसारला न दिसता वावरते आहे अशी काहीशी (मालीकेतील) कथा आहे.
कुणा एका मराठी दिग्दर्शकाच वाक्य आहे व्हीलनला जेवढे जास्त व्हीलन केले दाखवले तेवढे हिरो अधिक हिरो वाटतो.
तर या मालीकेत बाहेरचे दोन तीन (मांडलीक) राजे व्हीलनच्या स्वरूपात दाखवले आहेत.
बिंदुसारची सावत्र आई हेलना ग्रीक राजा सेल्यूकल निकेटरची मुलगी आहे
जीने युद्धात वडीलांचा पराभव झाल्यामुळे चंद्रगुप्ताशी विवाह केला, वरून मगधवर प्रेम करणारी पण प्रत्यक्षात कटकारस्थानांनी मगध साम्राज्याचा नाश करून आपला पुत्र जस्टीनला सिंहासनावर बसवून राजमाता होण्याचे तिचे स्वप्न कुमार अशोक आणि आचार्य चाणक्य यांच्यामुळे धुळीस मिळते.
बिंदुसारचा पहिला मुलगा सुशीम हा सुद्धा अहंकारी व्हिलन स्वरूपात कुमार अशोकवर उगाचच सतत खार खाऊन असतो आणि त्याच्या आईचे (बिंदुसारच्या महाराणीचे) स्वप्नही राजमाता व्हायचे आहे.
सम्राट बिंदुसारची एकराणी शुभरसी चांगल्या स्वभावाची दाखवलेली आहे जीच्याकडे अशोकची आई दासी स्वरूपात लपून राहते आहे.
सम्राट बिंदुसारची तीसरी राणी नूरसुद्धा तिच्या मुलाला सम्राट स्वरूपात पाहू इच्छिते. राणी नूरचे चरित्र मात्र ती पत्नी बिंदुसारची असली तरीही प्रत्यक्षात ती बिंदूसारचा मोठा भाऊ जस्टीनवर प्रेमही करते आणि नूरचा मुलगा खरेतर जस्टीन पासून झालेला असतो
(इति कलर्स मालीका-लेखकाचे स्वांतत्र्य - बहुधा नकारात्मक गोष्टींच्या अनुभवातून अशोक दुख्खाचे कारण शोधत अशोक पुढे बौद्ध धर्म स्विकारणार आहे त्या दृष्टीने अशोकच्या जिवनातील वेगवेगळ्या प्रसंगांची रचना करण्याचा लेखकाचा प्रयत्न होता का कि केवळ धारावाहीकात मसाला भरणे हे मालिकेत पुढे काय होते यावरून कळेल)
👉बिंदुसार, त्याची ग्रीक वंशीय आई हेलेना,. 👉त्याचा सावत्र सासरा सेल्यूकस निकेटर, 👉मुलगा सुशीम, 👉आचार्य चाणक्याचा शिष्य राधागूप्त, 👉अशोकची आई धर्मा
हि नावे अशोकाच्या आईचे राजवाड्यापासून बराच काळ दूर असणे या आता पर्यंतच्या सम्राट अशोकाच्या बाबतीत माहित आहे असे समजल्या जाणार्या गोष्टी मालीकेत जशाच्या तशा आहेत पण बाकीचे दाखवलेले प्रसंग अत्यंत काल्पनीक आणि लेखकाने लेखनाचे प्रचंड स्वातंत्र्य घेतले आहे. योगा योगाने मालिकेच्या लेखकाचेही नाव अशोक बनकर आहे पण ते बहुधा योगा योगा योगानेच.
इंग्रजी विकिपीडियावरील माहितीनुसार अशोक बनकरांचे पालनपोषण मॅटर्नल अँग्लोइंडीयन बाजूने झाले आहे. आणि ते इंग्रजी भाषिक लेखक म्हणूनही परिचीत आहेत तेव्हा त्यांची ही मालीका इंग्रजीत अनुवादीत होऊन बाकी जगभर प्रसिद्धी मिळवू शकली तर नवल असणार नाही.
कलर्स आणि अशोक बनकर टिमने मिळून मालिकेत दर्शवलेला इतिहास हा नव्याने लिहीलेला आहे. तो बराचसा पॉलीटीकली करेक्ट लिहिण्याचा प्रयास त्यांचा यशस्वी होताना दिसतो. तो काळाच्या ओघात मिथॉलॉजी म्हणून नजीकच्या भविष्यात जनमान्यता मिळाल्यास आश्चर्य वाटावयास नको.
खर्या व्यक्ती नामांच्या जवळ जाऊन सुद्धा बहुतांश काल्पनीक आहेत. नकारात्मक प्रसंग इतपत चातुर्याने रंगवले आहेत की सहसा लेखकाच्या स्वातंत्र्यावर सर्वसामान्य जनतेतून फारसे आक्षेप येणार नाहीत उलट लोकप्रीयताच लाभण्याची शक्यता अधीक आहे.
या कलर्स मालिकेत मालिका प्रसंग काल्पनीक आहेत हे कुठे सांगीतले जात नाहीत. धागालेख चर्चेसाठी माझा मुद्दा लेखक आणि दिग्दर्शकांनी काल्पनीक प्रसंग रंगवण्याच्या स्वातंत्र्यावर नाही. पण कोणत्यातरी एका स्टेजला हे सर्व काल्पनीक प्रसंग आहेत हे लेखक आणि दिग्दर्शकांनी सांगावयास हवेत असे तुम्हाला वाटते का? या मालिकेतील मुख्य पात्रे सकारात्मक भूमीकेतच नव्हे अत्यंत आदर्श रंगवली आहेत की त्यांच्या लोकप्रीयतेत भरच पडेल.
लेखकाने कल्पनेतून रंगवलेल्या मिथॉलॉजीचा समाजावर ती मिथॉलॉजी खरीच आहे समजून किती प्रभाव पडावा ? बाकीही या मालिके संदर्भाने चर्चा करण्यास हरकत नाही जसे की या मालिकेत दाखवलेल्या पात्रांबाबत आणि प्रसंगांबाबत तुम्हाला काय वाटते. सम्राट अशोकाचा ज्ञात प्रमाण अथवा आख्यायिकातील इतिहास आणि मालिकेतील इतिहास यांची तुलना इत्यादी.
अर्थात काथ्याकुट करताना व्यक्तीगत टिका टाळाव्यात मिपा संपादकीय धोरणांचे यथोचीत पालन करावे हि नम्र विनंती

प्रतिक्रिया
8 Jul 2015 - 5:50 pm | प्रचेतस
मालिकेचा एकही भाग बघितलेला नाही पण तुमच्या विवरणातूनच मालिका ऐतिहासिक संदर्भांच्या बाबतीत पूर्णपणे हुकलीय असेच दिसते.
आर्य चाणक्याचा मृत्यु अशोकाच्या जन्माआधीच झालेला होता. त्यामुळे पुढचे वाचण्यात काहीच स्वारस्य उरले नाही.
8 Jul 2015 - 6:04 pm | माहितगार
सेल्युलस निकेटर त्याला दुसरा उद्योग धंदा नसल्यासारखा पाटलीपुत्रात पडीक दाखवला आहे. ज्याने इतिहास वाचला आहे त्याने या मालीकेत खरा इतिहास शोधणे अपेक्षीत धरताच येत नाही. पण एक मिथॉलॉजीकल नाट्य म्हणून इतर लोक किती स्टार्स देतील माहित नाही पण 'बरे' हे किमान विशेषण देण्यास हरकत नसावी. बाकीचे मिपा प्रेक्षकांची काय मते आहेत पाहुयात.
9 Jul 2015 - 12:10 pm | विशाल कुलकर्णी
आर्य चाणक्याचा मृत्यु अशोकाच्या जन्माआधीच झालेला होता. त्यामुळे पुढचे वाचण्यात काहीच स्वारस्य उरले नाही.याबद्दल अजुन माहिती मिळू शकेल का? कारण आंतरजालावर काही वेगळ्याच सनावळ्या उपलब्ध आहेत. विकीवर (जरी तिथली माहिती पुर्णपणे ऑथेंटीक नसली तरी) चाणक्याचा मृत्यु 275 BCE असे दाखवतेय, तर अशोकाच्या राज्याभिषेकाचा कालावधी 269 BCE असे दाखवतेय. जाणकारांनी कृपया यावर प्रकाश टाकावा.
9 Jul 2015 - 12:41 pm | प्रचेतस
कौटील्याचा काळ साधारणपणे इ.स. पू ३२० च्या आसपासचा मानला जातो. चंद्रगुप्त मौर्याचे राज्यारोहण झाले इसपू ३२१. तेव्हा चाणक्य हा बराच वृद्ध होता त्यामुळे अशोकाच्या वेळी तो हयात असणे हे असंभवनिय आहे.
फ्लीट, हर्मन, मेयर आदी हाच काळ आधारभूत मानतात मात्र भांडारकर, काणे, दामोदर कोसंबी, कीथ, स्टाईन, विंटरनिट्झ आदी विद्वान चाणक्याचा काळ इसपू ५०० पर्यंत नेतात तर अगदी थोडेसे संशोधक ते इसपू २०० पर्यंत नेतात तथापि डॉ. कंगल्यांसारख्या विद्वांनानी चाणक्याचा काळ फ्लीट, हर्मन प्रभृतींनी निश्चित केलेल्या परंपरागत काळाशीच संबंधित आहे असे सिद्ध केले आहे.
उपरोक्त विवेचनाचा आधार हा कौटिलीय अर्थशास्त्र ह्या ग्रंथाच्या दुर्गा भागवत यांच्या प्रस्तावनेत आहे.
9 Jul 2015 - 5:09 pm |माहितगार
चंद्रगुप्ताने उत्तरार्धात संन्यास वगैरे घेतल्याचे वाचण्यात होते. अशोकाच्या राज्याभिषेकापर्यंत चंद्रगुप्त स्वतः जीवंत असणे शक्य होते का ?
9 Jul 2015 - 6:23 pm |प्रचेतस
शक्यता जवळजवळ नाहीच.
10 Jul 2015 - 8:58 am | विशाल कुलकर्णी
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद प्रचेतस !
9 Jul 2015 - 4:45 pm | संदीप डांगे
275 BCE हे 269 BCE च्या ५ वर्षआधी येतं, नंतर नाही.
8 Jul 2015 - 6:31 pm | अस्वस्थामा
एक महत्वाचा मुद्दा असा की "काल्पनिक" असणे जर त्यांनी अधोरेखित केलेले नसेल तर बरेच पब्लिक "असेही असू शकेल" असे मानेल आणि (बहुमान्य) तोच इतिहास म्हणून परत ठासून मांडत वादही घालत बसेल. तेव्हा यात आपण इतिहास जरी शोधत नसलो तरी चुकीचा इतिहास प्रसृत होणे देखील समर्थनीय नाही.
(सबब त्यांनी "आधारित फिक्शन" असे स्पष्ट म्हणावे असे वाटते)
9 Jul 2015 - 12:27 pm | बॅटमॅन
एग्झॅक्टली. :( अशांच्या नादी लागण्यातही अर्थ नाही.
9 Jul 2015 - 2:20 pm | अस्वस्थामा
हो रे. पण बर्याच वेळेस असा नॉनसेन्स सहन करणं कठिण होतं (मालिका नै त्यावरुन "असेही असू शकेल" असा दावा करणारे ).. :)
9 Jul 2015 - 2:41 pm | बॅटमॅन
अशांना फक्त इतकंच सांगायचं, पिच्चर तर हॅरी पॉटरवरही निघालाय, तेवढ्यावरनं काय हॉगवर्ट्सची एण्ट्रन्स एक्झाम देणार आहात काय?
9 Jul 2015 - 2:57 pm |अस्वस्थामा
हा हा हा..
हे भारीय.. :))
8 Jul 2015 - 6:41 pm | संग्राम
मालिका चालू असताना "आधारित फिक्शन" अशा आषयाची तळटीप दाखवतात
8 Jul 2015 - 6:44 pm | माहितगार
हो का ? सम हाऊ माझे लक्ष गेले नसावे, पुन्हा एकदा पाहीन टिव्ही पडद्याच्या साईझवर अवलंबून नसेल ना.
8 Jul 2015 - 7:41 pm | नीलकांत
केवळ सादरीकरण उत्तम आहे असे मी म्हणू शकतो. मात्र ज्याने इतिहास वाचला आहे त्याला ह्या मालीकेमुले वैतागच येतो. मात्र नवीन लोकांना ही मालीका खिळवून ठेवते आहे असे निरिक्षण आहे.
१) या मालीकेत एक मांडलीक राजा ऊर्दुमिश्रीत हिंदी बोलताना दाखवले आहे. हे मोठे नवल आहे. उर्दू ही खुप नंतर आली आहे.
२) आर्य चाणक्यांनी गुराखी चंद्रगुप्ताला हाताशी घेतला व सिंहासनावर बसवले. त्यामुळे चंद्रगुप्त त्यांच्यासमोर सदैव शिष्यासमान विनयानेच राहीले असतील. येथे चंद्रगुप्ताचा मुलगा चाणक्यांच्या स्वामीनिष्ठेवर शंका घेतोय.... (कायच्या काय...)
३) या सिरीयलमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वात वेंधळा, गाफील आणि ज्याला सर्व गोष्टी सर्वात शेवटी माहिती पडतील असा मुर्ख राजा बिंदुसार नक्कीच नसावा.
४) अशोकाची आई अतीच आदर्श आहे. (मालीकेची गरज असावी.)
माझ्या मते तरी सम्राट अशोक हा कलींगच्या लढाईपुर्वी एका सर्वसामान्य मात्र पराक्रमी राजासारखाच होता. कलिंगच्या लढाईतील नरसंहार त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या मालीकेत किंवा एकूणच सर्वच ऐतिहासीक मालिकेत त्या त्या हीरोला अगदी लहानपणापासुनच महान दाखवण्याचा अट्टाहास असतो. हा भारतीय आदर्शपुजेचा दबाव असेल का?
- नीलकांत
9 Jul 2015 - 12:12 pm | विशाल कुलकर्णी
नीलकांत +१
9 Jul 2015 - 6:03 pm | चिगो
'नाटक' किंवा 'ऐतिहासीक पात्रांवर कैच्या कै कल्पनाविलास करुन रचलेले नाटक; म्हणून बघितल्यास सादरीकरण म्हणून चांगलं आहे.. आता अशोकाला पार लहानपणापासूनच 'सिक्स पॅक हिरो' म्हणून दाखवलाय.. त्यातलं ढिन्चॅक संगीत आणि भारीतलं नेपथ्य आणि सादरीकरण म्हणून बघतो कधीमधे.. बाकी 'ऐतिहासीक मालिका' मग ती अशोकाबद्दल असो, वा रजिया सुलतानबद्दल वा चंद्रगुप्त मौर्याबद्दल आ अगदी शिवाजीमहाराजांवर असो, सगळ्या 'सास-बहु' इन्स्पायर्डच असतात, हे पक्कं मान्य झाल्याने त्यांत मी इतिहास शोधत नाही..
8 Jul 2015 - 9:09 pm | सत्याचे प्रयोग
आम्ही पाहतोय ही १मेव मालिका. खिळवून टाकणारे सादरीकरण आणि पुढील भाग पाहण्याची उत्सुकता निर्माण करून १-१ भाग संपवतात.
अशोक ची आई झालेली अभिनेत्री मराठी आहे बहुतेक.
9 Jul 2015 - 12:20 am | निनाद मुक्काम प...
ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि तो इतिहास ५० टक्क्याहून अधिक अचूक आहे अशी खात्री आहे त्यांनी संक्षिप्त स्वरुपात इतिहास येथे सांगावा
माझ्या माहितीनुसार चाणक्यांचा मृत्यू नक्की कधी केव्हा झाला ह्याचे अचूक पुरावे उपलब्ध नाही मुळात बिंदू सार विषयी जास्त माहिती नाही
दुर्देवाने ह्या देशात बाबासाहेबांनी शिवशाही वर जेवढे संशोधन केले तेवढे इतिहासाच्या कोणत्याही कालखंडावर झालेले नाही
इस्लामी आक्रमणाच्या नंतर त्यांच्या इतिहासाचे दाखले अनेक वेळा वाचनात आले.
तेव्हा आपण वाचलेला इतिहास खरा व मालिकेत दाखवलेला अतिरंजित अशी धारणा करणे म्हणजे ,,,,
मुळात ही धारावाहिक मालिका आहे तेव्हा नाट्य अतिरंजित पणा नक्कीच असणार
मी हि मालिका रोज पाहतो कारण
ह्या मालिका डोळ्याचे पारणे फेडते
ह्यातील बरेच कलाकार ओळखीचे मराठी आहेत नवोदित मराठी कलाकार सुशीम हा मराठी वाहिनीवरील एका रीयालती शो मधील स्पर्धक आहे , उत्कृष्ट नर्तक व चांगला अभिनेता आहे .
प्रत्येक कलाकाराचे काम उत्कृष्ट झाले आहे
जर्मन सुझान जेवढ्या सफाईने हिंदी बोलते तेवढे अजून सोनियादेवी सुद्धा बोलू शकत नाहीत ,
ही मालिका पाहतांना मला बरेच वेळा गो , वि दातार किंवा नाथमाधव ह्यांची कादंबरी वाचत असल्याचा भास होतो ,
सदर मालिका अंबानी च्या मालिकेच्या वाहिनीवर चालू आहे
ही मालिका पाहतांना मला नेहमीच ह्यातील पात्र त्यांच्यावर चित्रित प्रसंग हे सध्याच्या भारतीय राजकीय घडामोडींची आठवण करून देतात
हेलेना म्हंजे सोनिया व जस्टीन म्हणजे राहुल व चाणक्य म्हणजे भागवत
जस्टीन ची अगतिकता मला राहुल च्या राजकीय प्रवासाची आठवण करून देते
ह्या दृष्टीकोनातून तुम्ही मालिका पाहिलं की हेलेना व चाणक्य किंवा हेलेना व जास्त्न ह्यांचातील संभाषणातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गर्भित अर्थ ध्यानात घेता येतो
हे जग ४थ जनरेशन वॉरफ़ेअर चे आहे , लोकांच्या गळी एखादी गोष्ट काळात नकळत उतरवणे हे ह्या युद्धकलेचे प्रमुख अंग आहे
गेल्या ५ वर्षात भारतीय अनेक हिंदू महाराजे व माजानायाकांवर आधारीत मालिका छोट्या पडद्यावर आल्या
त्यात शिवराय , चंद्रगुप्त , राणी लक्ष्मी बाई , महाराणा प्रताप असे वानगीदाखल नावे सांगता येतील
आमच्या वडलांची पिढी भारतीय इतिहास म्हणजे मोगले आझम त्यातील व्यक्तीरेखा पत्रे ह्यावर पोसली गेली ,
हि मालिका पाहतांना आजही भारताची राजमुद्रा असलेला सिंह मेक इन इंडिया च्या स्वरुपात परत अवतीर्ण झाल्याचे दिसून येते ,
ह्या मालिकेकडे नवीन पिढीने पाहतांना अशोकची मातृ भक्ती
असो धर्मा व चाणक्य ह्याच्यातील हिंसा व अहिंसा वर केलेले भाष्य असो छोट्या छोट्या प्रसंगातून संवादातून काहीतरी सकस ऐकल्याचे समाधान मिळते.
अशोकाच्या आधी घडलेला सर्व इतिहास हा आपल्यापुढे केवळ तुकड्या तुकड्यात येतो .
तटस्थ वृत्तीने इतिहासाचे तंतोतंत लिखाण आपल्याकडे दुर्देवाने झाले नाही
आजही भारतात प्राचीन इतिहासाचे गोडवे गातांना इतिहास हा विषय शाळेत मुलांना जास्तीतजास्त नावडता कसा होईल ह्याकडे शासनाचे लक्ष असते,
सर्वधर्मसमभाव जपणारा टिपू सुलतान आपल्या पुढे सादर झाला तेव्हा कोणीही आक्षेप घेतले नाही
असो .
बाकी अशोक ते चंडशोक हा प्रवास कसा होणार हे पाहणे मनोरंजक आहे
बाकी अशोकाची माता देवी धर्मा ब्राह्मण होती ही माहिती नव्याने कळली
माझ्या वाचण्यात
गांधीजींच्या वर लहानपणी त्यांच्या आईने जैन धर्मची माहिती बिंबवली व तेथून पुढे अहिंसा शाकाहार ह्यांचा अट्टाहास त्यांचा तत्त्वज्ञानाचा पाया झाला
कदाचित अशोक वर त्यांच्या आईचे संस्कार असतील म्हणूनच पुढे तो महान अशोक होऊ शकला
अशोक भारतीय इतिहास आदिवितीय एकमेव उदाहरण आहे .
स्वतंत्र भारतात नेहरू प्रणीत सरकार ने सुद्धा चंडशोक लक्षात न घेता त्यापुढे अशोकाने जे कार्य केले त्या प्रीत्यर्थ भारतीय राष्ट्रध्वजात व राजमुद्रेस त्यास महत्त्वाचे स्थान दिले
त्याच देशातील जनतेने गुजरात मधील काही लोकांच्या मते चंडशोक असलेलेले नमो देशाच्या मानाच्या स्थानावर प्रस्थापित केले , हे सुद्धा आपसूकच अधोरीत केले आहे ,
बाकी इतिहासाची प्रतारणा होऊनही जर माहितगार ही मालिका नित्यनियमाने पाहत असतील तर त्या मालिकेचे हे मोठे यश आहे
ही मालिका बनविण्यात मराठी माणसांचा मोठा हात आहे हे पाहून बरे वाटते
9 Jul 2015 - 12:24 pm | माहितगार
या घडीला जे लोक आपले हे वाक्य वाचतील त्यातील बहुतांश लोकांना 'बाबासाहेब' हा उल्लेख कोणत्या व्यक्ती बद्दलचा आहे हे लागलीच लक्षात येईल, पण अगदी प्रत्येकाला लक्षात येईलच असेही नव्हे, आता आपल्या या वाक्याचा संदर्भ घेत शिवशाहीवरील संशोधनाचे क्रेडीट बाबासाहेब नावाच्या वेगळ्याच व्यक्तीस (मराठी विकिपीडियावर बाबासाहेब नावाच्या ६ उल्लेखनीय व्यक्ती आहेत) दिले तर बाबासाहेब नावाच्या दोन व्यक्तींच्या इतिहासाची तोडमोड होणार नाही का ? म्हणून इतिहासातील अचूकता शक्य तेवढ्या तटस्थतेने सांभाळली जाण्याचे स्वतःचे महत्व आहे. (इथे कोणताही इतिहास पुर्ण सत्य आहे असा दावा करण्याचा उद्देश नाही हे वेगळे सांगणे न लगे)
बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लेखन करतानाची त्यांची भूमीका त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत आली आहे. बाबासाहेब पुरंदरें म्हणतात.. "...ऐतिहासिक सत्य आणि पारंपरिक आख्यायिका यांचा मी उपयोग केला आहे. संवाद व वर्णने जेवढी अस्सल मिळाली तेवढी मी वापरली आहेत. बाकीची सत्याच्या अनुरोधाने घातली आहेत. हा काटेकोर शास्त्रीय इतिहास नव्हे. बखरी व अस्सल पत्रे यांचा मुक्त वापर आहे...." संदर्भ
मी ललित साहित्याचा वाचक नसल्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंयांची पुस्तके वाचलेली नाहीत पण त्यांच्या काही ग्रंथात त्यांनी संदर्भ नोंदवण्याचा प्रयत्न केलेला असावा हे स्विकारून; केवळ बाबासाहेब पुरंदरे म्हणून नव्हे कोणत्याही इतिहासाच्या लेखकाने काटेकोर शास्त्रीय इतिहास आणि लेखकाने स्वतः स्वातंत्र्य घेऊन केलेली काल्पनिक सरमिसळ त्या लेखकास व्यक्तीशः सत्याच्या अनुरोधाने आहे असे वाटत असले तरीही काटेकोर शास्त्रीय इतिहासाच्या अभ्यासकास तथाकथीत सत्याच्या अनुरोधाने केलेली सरमिसळ काल्पनिक आणि सब्जेक्टीव्ह आहे हे लक्षात येत असते. तेव्हा काटेकोर शास्त्रीय इतिहासाच्या अभ्यासकाने वाचलेला इतिहासही कितपत खरा असेल हा निश्चितपणे वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, (पण एका त्रुटीने दुसर्या त्रुटीचे समर्थन होत नाही) पण या चर्चेत असलेल्या दूरचित्रवाणी मालिकेतील बद्दल कुणी अतिरंजित अशी धारणा करणे म्हणजे, खरेच असे ,,,, का सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही त्या मागून होऊ शकतो ? "वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध" ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो. म्हणून अतीरंजततेबद्दल सांशंकता व्यक्त करणार्यांच्या शंकांची सुद्धा दखल घेतली पाहीजे असे वाटते आणि धाग्याचा उद्देश अंशतः अशा शंकांची दखल घेणे आहे.
आपण परिच्छेदाच्या सुरवातीस जे म्हणता "ज्यांनी इतिहास वाचला आहे आणि तो इतिहास ५० टक्क्याहून अधिक अचूक आहे अशी खात्री आहे त्यांनी संक्षिप्त स्वरुपात इतिहास येथे सांगावा" असे मलाही वाटते.
9 Jul 2015 - 2:36 pm | अस्वस्थामा
ह्म्म.. वानगीदाखल राजवाडे यांच्याबद्दल ऐकले आहे काय हो ? नै त्यांनी जन्मच वाया घालवला म्हणायचा.
बाकी असोच.
9 Jul 2015 - 4:48 pm | संदीप डांगे
सहमत. निनादभौ, चेक द फॅक्ट बीफोर पोस्टींग...
10 Jul 2015 - 4:57 am | निनाद मुक्काम प...
प्रतिसाद देतांना मला असे म्हणायचे होते की शिवशाहीच्या कालखंडावर विपुल व विविध अंगाने संशोधन झाले तेवढे इतरांच्या बाबतीत नाही झाले हा मेन मुद्दा आहे
आणि उदा म्हणून मी पुरंदरे ह्यांचे नाव लिहिले त्याचा अर्थ अजून कोणीच केले नाही असा होत नाही आणि तसा अर्थ जर माझ्याकडून ध्वनित झाला तर शमस्व , पण ह्यावरून अवांतर नको ,
वोशील ने चाणक्यांच्या काळ कोणता ह्यावर लिहिले मी ह्या आधी चाणक्यांचा मुर्त्यू कसा झाला ह्यावर आंजा वर शोधले तर ही माहिती मिळाली
फार पूर्वी अशोकवर पुस्तक वाचले होते किंबहुना अशोक सिनेमा पाहून खास अशोकवर अजून वाचायचे म्हणून वाचनालयातून मिळवून वाचले होते नाव आठवत नाही पण त्यात चंडशोक चे वर्णन होते. आणि अशोकाने बौद्ध कन्येशी प्रेम विवाह केल्याने राजदरबारी काही मंडळी सुशीम च्या बाजूने असतात तेव्हा अशोकाचे व सुशीम चे राजनीतिक डावपेच अधिक विस्ताराने वाचले होते.
माहितीगार ह्यांच्या प्रतिसादात म्हटले आहे त्या प्रमाणे भावांच्या मधील स्पर्धा राण्यांच्या मधील सत्ता इर्षा लोभ मत्सर
व महत्त्वाचे म्हणजे खुरासनी युनानी व हिंदू वंशीय ह्यांचा सिंहासनाला चाललेला सत्ता संघर्ष अश्या बरर्याच गोष्टी ह्या निमित्ताने दिसतात
काही वर्षांच्या पूर्वी भारतातील राजमातेचे परकीय रक्त तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी आड आले , त्या घटनेला नैतिक अधिष्ठान ह्या मालिकेतून चढवण्यात येते, हेलेना व जस्टीन च्या मुखी अनेक संवाद मुद्दामहून दिले गेले आहेत असे वाटते.
चंद्रकांता , वीरधवल किंवा कालिकामूर्ती ह्या व त्या धर्तीच्या कांदबर्या ज्यांनी वाचल्या असतील त्यांना हेरी पोटर चे नवल वाटणार नाही किंवा अशोक मालिका पाहतांना तसा फील येतो ,
अवांतर
अलंकार फारच गोड दिसते बुआ
आता अशोक व तिच्यात मधुर संबंध प्रस्थापित होणार की निखळ मैत्री होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आपल्या बुआ सुशीम अधिक आवडतो , पुण्याचा सुमेध ने मराठी सिनेमातून किंवा बॉलीवूड मधून दमदार एन्ट्री केली पाहिजे असते वाटते
लुक्स नृत्य अभिनय अजून काय पाहिजे राव स्टार व्ह्ययला आपल्याकडे
अशोकाची भूमिका करणारा प्रशिक्षित जिम्नॅस्टिक खेळाडू आहे.
अती अवांतर चंद्रकांता प्रमाणे गो ना दातार ह्यांच्या कादंबऱ्यांवर एखादी धारावाहिक निघावी असे मनापासून वाटते..
10 Jul 2015 - 9:05 am | विशाल कुलकर्णी
अलंकार फारच गोड दिसते बुआतुम्ही त्या 'राजाजीराज' नामक मांडलिकाच्या जो बिंदुसाराच्या हत्येच्या कटात सहभागी आहे कन्येबद्दल बोलताय का? तसे असेल तर तिचे नाव 'अलंकार' नाही 'अहंकारा' आहे :)
10 Jul 2015 - 11:04 am |माहितगार
राजकीय विवाहांमुळे पुढील पिढीतील राजा ठरवला जाताना मालिकेत रंगवल्या प्रमाणे सत्तासंघर्ष होऊ शकत असावेत. अर्थात ह्या मालिकेत खुरासान प्रकरण (नूर आणि तीचे वडील) घेतले आहे ते मौर्यकुलाच्या इतिहासाचे माझ्या (जुजबी) वाचनात तरी आलेले नाही, बहुधा पुर्ण काल्पनिक असावे.
युनानी सेल्यूकस निकेटरच्या दोन मुली होत्या एकीचे नाव हेलेना आणि दुसरी डिओडोरा.
चंद्ररगुप्ताने सेल्यूकस निकेटरला युद्धात परास्त केल्यानंतर (पश्चिम) भारतातील भूभाग आणि हेलेनाशी लग्न हे ऐतिहासीक तथ्याशी धरून असावे.
चंद्रगुप्ताच्या दुसर्या एका पत्नीचे (जी बिंदुसारची माता होती) नाव दुर्धरा असे येते जे डिओडोरा शब्दाचा अपभ्रंशतर नाही अशीही शंका घेतली जाते.
चंद्रगुप्त आणि बिंदुसारच्या काळात जैन आणि बौद्धधर्मियांचा प्रभाव बर्यापैकी असू शकतो म्हणजे बिंदुसारच्या व्यक्तीगत निष्ठा वैदीक होत्या कि नव्हत्या ह्याचा कितपत स्पष्ट निर्देश इतिहासास उपलब्ध आहे याची कल्पना नाही शिवाय बिंदुसाराची माता दुर्धरा आणि युनानी डिओडोरा एकच असतील तर जस्टीन प्रमाणे बिंदुसारमध्येही मातेच्या बाजुने युनानी रक्त असण्याची शक्यताही शिल्लक राहतेच. अर्थात जस्टीन आणि बिंदुसार सावत्र एवजी सख्खे भाऊही असते तरीही सत्तासंघर्ष झालाच नसता अथवा नसावा असेही नाही.
या मालिकेतील त्याहीपेक्षा कच्चादुवा म्हणजे सेल्युकस निकेटर कडे पश्चिम भारत चंद्रगुप्ताला दिल्यानंतर सुद्धा पर्शीयाचा प्रचंड मोठा भूभाग शिल्लक असावा आणि तो त्याच्या (पर्शियाच्या पश्चिम?) आघाडीवर सत्ता संघर्षात इतपत व्यस्त असावा की त्याचा पाटलीपुत्रात पडीक राहून कटकारस्थानात प्रत्यक्ष सहभाग तार्कीक दृष्ट्या संभवनीय वाटत नाही. मौर्य वंशाचा काळ इतपत जुना आहे की इतिहास संशोधनातुन मूळ दस्तएवज नव्याने मिळण्याची शक्यता अंधूक असू शकते पण बरीच कमी असावी. त्यामुळे इतिहासकारांनाही काल्पनीक कथा रंगवण्याशिवाय पर्याय नाही.
:) मालिकेचे लेखक अशोक बनकरयांची आई बहुधा पोर्तुगीज वंशाची आणि संगोपन आजोळी झालेले आहे असे इति इंग्रजी विकिपीडियातून दिसते. पण ते गोव्याचे आहेत आणि अंबानींच्या चैनल ची माया आहे असे म्हणता तेव्हा कै नक्की सांगता यायच नै.
9 Jul 2015 - 5:40 pm | माहितगार
प्रत्येक पिढीला स्विकार्ह असलेले (शक्य असल्यास सर्वमान्य) महानायक हवे असतात किंवा तशी गरज असते. आणि भारतीय इतिहासातील सम्राट अशोक हे भारतीय जनमानसात सर्वमान्य महानायक होण्यास सर्वसाधारणपणे पात्र आहेत. जिथे जिथे बौद्ध धर्म गेला आहे तेथे सम्राट अशोक पोहोचतातच पण पाकीस्तान सारख्या देशात त्यांच्या इतिहासात हिंदू धर्मीय कालावधी दाखवण्याचे टाळून त्यांचा इतिहास बौद्ध धर्मीय होता असे दाखवताना सम्राट अशोकचा इतिहास त्यांनाही टाळणे अंमळ अवघड जाणारे आहे. म्हणून दक्षीण आशीया उपमहाद्वीपात सम्राट अशोक हा एक सर्वमान्य महानायक म्हणून अग्रगण्यांपैकी निश्चीत आहे.
महानायकांची प्रतीमा कला आणि कलाकारांच्या माध्यमातून जनमानसात घडण्यास बराच हातभार लागतो. काटेकोर शास्त्रीय इतिहासकारा प्रमाणे ज्ञानासाठी ज्ञान पेक्षा; कलाकार त्याची कला ज्ञानक्षेत्रातल्या काटेकोरपणा पासून भटकलीतरीही कलेसाठी कला, प्रबोधनासाठी अथवा रंजनासाठी कलेची निर्मिती करतो. कलाकारास त्याच्या कलेला हव तस घडवण्याच स्वातंत्र्य असल पाहिजे हे निश्चित पण मूळ प्रेरणा असलेल्या काटेकोर शास्त्रीय ज्ञानापासून आपण कुठे कुठे स्वातंत्र्य घेतले आहे हे कलाकाराने नमुद करणे श्रेयस्कर वाटते. बाकी निव्वळ कला निर्मात्यांचे दृष्टीकोण लक्षात घेतले तर या मालिकेतून सम्राट अशोकाचे महानायकाच्यारूपात सादरीकरणाकडे सकारात्मकपणे पाहता येते,
सम्राट अशोकाचे चंड-अशोक हे रुपही (बखरवजा) आख्यायिकेतून येत असावे. व्हीलनला अधीक व्हीलन दाखवले की नायक आपोआप उठून दिसतो तसे, बौद्धधर्म घेतलेला अशोक उठून दिसण्यासाठी तत्पुर्वीचा अशोक चंडअशोक स्वरुपात विशीष्ट दृष्टीकोण बाळगणार्या लेखकांनी त्यांच्या आख्यायीकातून रंगवला नसेलच असे नाही. सध्यातरी कलर्सवरील मालिकेत रंगवलेली अशोकाची प्रतीमा आख्यायीकेतील चंड-अशोकाचे रुप घेईल असे वाटत नाही पण पुढे मालीका पाहूनच काय ते समजेल.
9 Jul 2015 - 6:22 pm | प्रचेतस
चंड अशोक उपाधी म्हणजे काय? मी तरी पहिल्यांदाच चंड अशोक ऐकतोय.
9 Jul 2015 - 6:51 pm |माहितगार
काही (बौद्धधर्मीय?) बखरवजा साधनांमध्ये अथवा काही आख्यायिकांमध्ये बौद्धधर्म स्विकारण्यापुर्वीचा राजसत्तेच्या स्पर्धत असलेला अशोक म्हणजे क्रौर्याची परिसीमा असलेला असा रंगवला आहे ज्यात अशोक सम्राटपद मिळवण्यासाठी शंभर एक भावांची हत्या करतो, सम्राट झाल्या नंतर त्याच्या राज्यात मरणोत्तर नर्काच्या तोडीसतोड नर्क उघडतो वगैरे हा जो अशोकाचा मनपरिवर्तन पुर्वकालावधी काही आख्यायिकांनुसार चंड-अशोक म्हणून वर्णन केला गेला आहे. या आख्यायिकांच्या अतीरंजततेमुळे चंड अशोक या उभ्याकेलेल्या प्रतिमे बद्दल सत्यते बद्दल इतिहाससंशोधकांना शंका वाटत असावी. हाताशी संदर्भासाठी साधने न ठेवता लिहिले आहे, त्यामुळे जे लिहिले त्यास दुजोर्याची आवश्यकता असू शकते. चु.भू.दे.घे.
9 Jul 2015 - 7:00 pm |प्रचेतस
ओह्ह ओके.
बाकी कलिंगयुद्धाआधीच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली होती असे बरेच संशोधक मानतात मात्र कलिंगयुद्धानंतर अशोक हिंसेविषयी विरक्त झाला.
9 Jul 2015 - 7:28 pm |माहितगार
हो आंतरजालवर माझ्याही वाचनात असेच काहीसे आले आहे, की अशोकाच्या एका पत्नीने (कि जी बौद्धधर्मीय) होती युद्धात जखमि झाल्यानंतर सम्राट अशोकाची सुश्रुषा केली आणि तिच्या प्रभावाने अशोक बौद्ध धर्मीय झाला. पण चंद्रगुप्ताने ज्या अर्थी उत्तरार्धात जैन धर्माचा स्विकार केला म्हटले जाते हे खरे असेल तर एकुण अहींसावाद मौर्य राजघराण्यास एकदम नवा नसावा. बहुतांश भारतीय उपमहाद्वीप चंद्रगुप्ताच्या काळातच जिंकला गेला होता बिंदुसाराच्याकाळात दक्षीणभारतात मौर्यसाम्राज्याने राज्यांना मांडलीक केले, एक कलिंग वगळता तसे वस्तुतः खूप सार्या मोठ्या युद्धांकरता अशोकास कितपत आव्हान शिल्लक होते अशी शंका वाटते. अशोकावर तक्षशिलेच्या एका युद्धाचा प्रसंग आला तो प्रत्यक्षात युद्ध न होताच निभावला गेला. कितीतरी हिंसात्मक मोठी युद्धे कितीतरी सत्ताधीशांनी पाहिली असतील पण त्यांच्या पैकी सहसा इतर कुणी अहींसावादी झाल्याचे फारसे वाचनात येत नाही. म्हणून कलिंगयुद्धाआधीच अशोकाने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली होती असे बरेच संशोधक मानतात मात्र कलिंगयुद्धानंतर अशोक हिंसेविषयी विरक्त झाला. असे शक्य वाटते.
9 Jul 2015 - 7:57 pm | बॅटमॅन
वेल, श्रवणबेळगोळ परिसरातील अनेक शिलालेखांवर चंद्रगुप्त-भद्रबाहू यांबद्दल लिहिले गेलेले आहे. शिलालेखांचा काळ इ.स. १० वे शतक व नंतरचा आहे. त्याच्या अगोदर काही असेल तर माहिती नाही.
9 Jul 2015 - 9:39 pm | प्रचेतस
हा भद्रबाहू कोण?
आणि श्रवणबेळगोळ परिसरातील उधृत चंद्रगुप्त हा मौर्यांपैकीच का? चंद्रगुप्त विक्रमादित्य असू शकेल का? चालुक्यांमधेही एक चंद्रगुप्त बहुधा होता पण खात्रीपूर्वक सांगता येत नाही.
बाकी इतक्या भीषण नरसंहारानंतरही जेमतेम ४०/५० वर्षात कलिंग राजवटीने पुन्हा उसळी खाल्ली.
याबाबत खारवेलाचा उदयगिरी समूहातील हाथिगुंफ़ा शिलालेख पुरेसा बोलका आहे.
9 Jul 2015 - 10:39 pm |माहितगार
एकसारख्या नावां मुळे इतिहास निटसा उलगडणे कठीण होते.
9 Jul 2015 - 9:49 pm |श्रीरंग_जोशी
अशोक हा २००० सालचा हिंदी चित्रपट अजून पाहिला नाही वाटतं. चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगांपैकी एकात हा उल्लेख आला आहे.
9 Jul 2015 - 11:43 pm |प्रचेतस
नाही पाहिला अजून.
10 Jul 2015 - 9:09 am |विशाल कुलकर्णी
नाही पाहिला अजून.पाहूही नकात. पाहण्यासारखं एक करीना सोडली तर इतर काहीही नाहीये त्यात. ;)
9 Jul 2015 - 6:09 am | देव मासा
जोधा अकबर मालिकेतील जोधा तर
चक्क इंग्रजीत I love You बोलते.
आणि अकबराला लिहलेल्या पत्रात
चक्क तसे लिहते सुद्धा , आणि सध्या
जोधाच्या अंगात लाबोनि नावच्या
एका बंगाली बाईचे भुत शिरले आहे.
आपन उगाच '' चीकट नवरा "
"बायको चुकली स्टैंडवर ' सारख्या
दर्जेदार मराठी चित्रपटांना नावे ठेवतो
9 Jul 2015 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
जोधा अकबर मालिकेतील जोधा तरचक्क इंग्रजीत I love You बोलते.
आणि अकबराला लिहलेल्या पत्रात
चक्क तसे लिहते सुद्धा
ऐकावे ते नवलच !!!
9 Jul 2015 - 3:06 pm | कपिलमुनी
पूर्वी वीर शिवाजी मालिकेमध्ये बाल शिवाजी जत्रेमध्ये सईबाईंच्या पाठीमागे लपतछपत हिंडताना दाखविले होते
9 Jul 2015 - 3:23 pm | बॅटमॅन
आता ते तरी काय करणार म्हणा...रणजित देसाई जर आपल्या कादंबर्यांमध्ये शिवरायांना ललित लेखक वगैरे बनवू शकतात तर बाल शिवाजी जत्रेत नक्कीच लपतछपत हिंडू शकतो, नै का?
स्वामी कादंबरीतले रमामाधवी संवाद पाहिलेत तरी हीच गत. त्या खर्या माधवरावान ही कादंबरी वाचली असती तर भर दरबारात गंगोबातात्यास फोडले त्याप्रमाणे लेखकास फोडले असते असे वाटल्यावाचून राहावले नाही =))
पानिपतकारही तसेच. त्यांनी तर एके ठिकाणी भाला फेकून खांडोळीही केलेली आहे. भाला फेकून खांडोळी करायला तो काय लोणीमॅन आहे?
पण सगळ्यात हाईट म्हणजे मृत्युंजयकार. युगंधरमध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णास कोल्हापुरात येऊन तिथल्या पैलवानाशी कुस्तीही खेळायला लावलेली आहे. =))
9 Jul 2015 - 3:42 pm | कपिलमुनी
यात भर म्हणून बरेचजण चर्चेमध्ये स्वामी, पानिपत, किंवा बेलवलकर यांच्या कादंबरीमधले दाखले देत असतात :)
9 Jul 2015 - 4:05 pm |योगी९००
यात भर म्हणून बरेचजण चर्चेमध्ये स्वामी, पानिपत, किंवा बेलवलकर यांच्या कादंबरीमधले दाखले देत असतात :)
हॅ हॅ हॅ
9 Jul 2015 - 4:29 pm | बॅटमॅन
ते तरी परवडलं, लोक काय तर पुना ओकांचे दाखलेही देतात. =))
(पुना ओक फ्यान) बॅटमॅन.
9 Jul 2015 - 4:40 pm |कपिलमुनी
ग्रीस हा शब्द गिरी + इश == ग्रीस असा तयार झाला आहे.
( पुनाफॅनमंडळ ग्रीसवाडी )
9 Jul 2015 - 5:04 pm |बॅटमॅन
खरंच आहे ते, ग्रीसमध्ये पहावे तिथे नुस्ते डोंगरच आहेत, त्यामुळे गिरीश नाव येणे हे अगदी स्वाभाविक आहे. त्यांच्या त्या फेमस ऑलिंपस पर्वताचे नावही "अलं पाश" अर्थात "(संसाराचे इ.) पाश नको" य संस्कृत शब्दावरूनच आलेले आहे.
अलेक्झांडर हे नाव अलक्षेन्द्र, तर आयोनियन हे नाव यवन वरून आलेले आहे. अथेन्स हे नाव अथणी गावच्या लोकांवरून आलेले आहे. पायथागोरस हा डोंगराच्या पायथ्याशी दूध अर्थात गोरस विकत असे त्यामुळे त्याचे नाव पायथागोरस पडले. सॉक्रेटिस हे नावही सकृतीश वरून आलेले आहे. प्लेटो हेही प्लुत वरून आलेले नाव आहे.
एवढेच कशाला, अकिलीस = अखिलेश, तर आगामेम्नॉनचा बाप आत्रेउस हाही दत्तसंप्रदायी होता.
रोमन साम्राज्यात दाढी करण्याचे प्रस्थ फार होते, त्यामुळे रोम-न अर्थात केस नसलेले अनेक लोक दिसत. त्यावरूनच नाव पडले. पण हे कुणी सांगत नाही.
अशा एक ना दोन अनेक गोष्टी आहेत, पण लक्ष्यात कोण घेतो? त्या इंग्लिश लोकांनी सगळे बिघडवून टाकले.
गर्वसे कहो, हम पुनाफ्यान हैं. पुना तिथे काय उना?
9 Jul 2015 - 5:46 pm | नाव आडनाव
राजीव दीक्षितांच्या एका विडीओत त्यांनी लुफ्तांसा ची फोड लुप्त + हंस (हंस जे लुप्त झाले आहेत) अशी सांगितली होती.
9 Jul 2015 - 5:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा !
Luft = लुफ्त (लुप्त नाही) = Air
Hansa = League / Union *
Lufthansa = लुफ्तांझा / लुफ्तांसा = Air Union / United Airlines (इथले दुसरे नाव केवळ लाक्षणिक भाषांतर आहे, याचा त्या नावाच्या एका अमेरिकन विमानकंपनीशी काहीही संबंध नाही !)
लुफ्तांझाने उडत्या हंसाचे मानचित्र घेतले असले तरी त्या हंसपक्षाचा नावातल्या Hansa शी काही संबंध नाही !
===============
* The Hanseatic League (also known as the Hanse or Hansa; Low German: Hanse, Dudesche Hanse, Latin: Hansa, Hansa Teutonica or Liga Hanseatica) was a commercial and defensive confederation of merchant guilds and their market towns. It dominated Baltic maritime trade (c. 1400-1800) along the coast of Northern Europe.
9 Jul 2015 - 5:59 pm | बॅटमॅन
उच्चारदृष्ट्या तशीच फोड आहे असे विकीही सांगतो.
https://en.wiktionary.org/wiki/Lufthansa#Etymology
फक्त अर्थ वेगळे इतकाच काय तो फरक.
9 Jul 2015 - 8:26 pm | मार्कस ऑरेलियस
>>>
अहो काही नवइतिहासकारांच्या मते अशोक हा बुध्दाचाच अवतार होता ! अता बोला !!
( अवांतर : प्रतिसाद टाईप केला होता , प्रकाशित केला होता की नाही ते आठवत नाही ... की प्रकाशित केल्या नंतर संपादित झाला हे ही आठवत नाही . अर्थात संपादित होण्यासारखे ह्या प्रतिसादात काही नाहीये म्हणा , अनाहितावर की कोण्या लाडक्या सदस्यावर टीका नाही , काही अश्लिल नाही , कोणाच्या भावना दुखावणारेही काही नाही . ज्या प्रमाणे पु.ना ओक ह्यांची मते ज्या प्रमाणे बहुतांशांचे मनोरंजन करतात तसेच ह्या इतिहासकारांची मते मजेशीर आहेत ! )
9 Jul 2015 - 8:53 pm | बॅटमॅन
हा हा हा, अगदी अगदी =)) =)) =))
एकूण मज्जाच मज्जा आहे सगळी =))
9 Jul 2015 - 5:12 pm |टवाळ कार्टा
हर्क्युलिस = हरी + कुल + ईश
:)
9 Jul 2015 - 5:34 pm | बॅटमॅन
टवाळ ओक =))
जमलंय हो!
10 Jul 2015 - 9:11 am | विशाल कुलकर्णी
च्यामारी सुटलेयत सगळे नुसते .... ;)
9 Jul 2015 - 3:42 pm | कपिलमुनी
यात भर म्हणून बरेचजण चर्चेमध्ये स्वामी, पानिपत, किंवा बेलवलकर यांच्या कादंबरीमधले दाखले देत असतात :)
9 Jul 2015 - 4:22 pm |अस्वस्थामा
वरती बॅट्याने हॅरी पॉटरचा प्रतिसाद दिलाय याचबद्दल.
पण बर्याच लोकांचा दावा असतो की हे मान्यवर लेखक, मालिका/चित्रपट निर्माते हे अभ्यास करुनच हे सगळे करत असणार (पक्षी:ते काय येडे हायत होय असं काही बाही लिहायला/दाखवायला). हे अजूनच डोक्यात जातं. स्वामी, श्रीमान योगी आणि पानिपताचा पगडा तर अतिशय आहे.
9 Jul 2015 - 4:28 pm |बॅटमॅन
हाथ मिलाओ, सेम हिअर. लैच डोक्यात जातं.
याला उत्तर इतकंच की हॅरी पॉटर आणि लॉर्ड ऑफ द रिंग्स हेही तुफान अभ्यासानिशीच लिहिलेले आहेत. तुफान अभ्यास म्हणजे सत्य असे आजिबात जरूरी नाही.
पण हे कुणाला, तर मेंदू थोडातरी शिल्लक असलेल्याला. नायतर शीर्यस चर्चेत "बघा बघा, खरा पुरावा पु ना ओकांच्या पुस्तकात दिलाय" म्हणून परम श्रद्धेने अर्ग्यू करणार्यांपुढे काहीच मात्रा चालत नाही. त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;)
9 Jul 2015 - 6:48 pm |अस्वस्थामा
हा हा हा.. हे शिकायला हवंय खरंतर. :)
9 Jul 2015 - 10:06 pm |डॉ सुहास म्हात्रे
त्यावर उपाय अलीकडेच थोडासा दिसू लागलाय, तो म्हणजे आपणही फेकाफेकी करायची तुफान- फक्त रिव्हर्स दिशेने. ;)अशी एक धुमश्चक्री बघायची आस आहे ! =))9 Jul 2015 - 4:06 pm | योगी९००
जबरा प्रतिसाद...
बाकी लोणीमॅन म्हणजे काय? बॅटमॅनचा भाऊ काय?
9 Jul 2015 - 4:24 pm | बॅटमॅन
हाहा, धन्यवाद!
9 Jul 2015 - 5:49 pm | माहितगार
सम्राट अशोकाच्या आख्यायीकेत आणि या मालिकेत सत्तेसाठीच्या साठमारीचे भावाभावातील संघर्ष वेगळ्या पद्धतीने रंगवले आहेत.
या मालिकेतून सत्तेसाठीच्या राजकीय तडजोडींसाठी विवाह आणि अशा राजकीय कारणांनी झालेल्या विवाहातून झालेल्या संततीत भावी सत्तेचा अंकुरपाहून इर्षा बाळगणारे हितसंबंध भावाभावातील संघर्षांना कसे कारणीभूत होऊ शकतात याचे रोचक दर्शन होते आहे.
सत्तेसाठी इतिहासातील भावांची साठमारी या विषयावर एनी कॉमेंट्स ?
22 Jul 2015 - 5:33 pm | स्मिता.
माहितगार यांचा हा लेख वाचून तुनळीवर या मालिकेचे सगळे भाग पाहिले. मालिकेला सर्व प्रकारचा प्रेक्षकवर्ग मिळवण्यासाठी यथायोग्य मसाला भरलेला असल्नेया ती इतिहासापासून भरकटलेली वाटत असली तरी एकंदर खिळवून ठेवणारी आहे.
ही मालिका म्हणजे इतिहासाचा आधार घेवून निर्मिलेली एक काल्पनिक नाटीका आहे आहे हे एकदा मान्य केले की त्यातल्या 'मसाला' नसलेल्या बर्याच गोष्टी विचार करण्यायोग्य वाटतात.
उदा. वर माहितगार यांनी उल्लेखलेला मुद्दा: "या मालिकेतून सत्तेसाठीच्या राजकीय तडजोडींसाठी विवाह आणि अशा राजकीय कारणांनी झालेल्या विवाहातून झालेल्या संततीत भावी सत्तेचा अंकुरपाहून इर्षा बाळगणारे हितसंबंध भावाभावातील संघर्षांना कसे कारणीभूत होऊ शकतात याचे रोचक दर्शन होते आहे."