दुसरा चंद्रगुप्त
दुसरा चंद्रगुप्त (Second Chandragupt)
चंद्रगुप्त, दुसरा : (इ.स. ३८० ‒ इ.स. ४१५). समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीनंतर त्याचा जेष्ठ पुत्र रामगुप्त गादीवर आला. शक राजाने रामगुप्तावर आक्रमण करून त्याचा पराभव केला. रामगुप्ताचा भाऊ दुसरा चंद्रगुप्त याने त्या पराभवाचा सूड घेत शक राजास ठार मारले आणि रामगुप्तास बाजूला सारून किंवा त्याचा खून करून स्वतः गादी मिळविली असावी. चंद्रगुप्त हा एक सामर्थ्यशाली, धाडसी व न्यायी राजा आणि उत्तम प्रशासक म्हणून ओळखला जातो. त्याने समुद्रगुप्ताचे राज्य तर अबाधित ठेवलेच, पण त्याशिवाय शक राजांचा पराभव करून सौराष्ट्र आणि गुजरात प्रांत आपल्या राज्यात समाविष्ट केला. त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावरची बंदरे त्याच्या आधिपत्याखाली आली. त्यानंतर त्याने वायव्येकडील अवंती आणि कुशाणांचे उर्वरित छोटे राज्य आपल्या साम्राज्यास जोडले. रामगुप्ताच्या काळात बंगालच्या राजाने गुप्त साम्राज्याचे मांडलिकत्व झुगारून दिले होते. चंद्रगुप्ताने बंगालवर चाल करून बंगालचा पराभव केला आणि ते राज्य आपल्या राज्यास जोडले. त्यानंतर त्याने सिंधू नदी पार करून त्यापलीकडील हूणांचा प्रदेश आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला. समुद्रगुप्ताच्या वेळच्या गुप्त साम्राज्याच्या सीमा चंद्रगुप्ताने काही पटींनी विस्तृत केल्या. पश्चिमेस सिंध व सौराष्ट्रापासून पूर्वेकडे बंगालपर्यंत आणि हिमालयापासून ते नर्मदा नदीपर्यंत त्याचे साम्राज्य पसरलेले होते. दक्षिणेत विदर्भात वाकाटकांशी विवाहसंबंधाकरवी त्याने मैत्रीचे नाते निर्माण केले. त्यामुळे दक्षिणेतील पश्चिम किनारपट्टीचा काही भाग चंद्रगुप्ताच्या ताब्यात आला. शक राजांना आणि सिंधू नदीच्या खोऱ्यातील हूणांना पराभूत केल्यामुळे भारतातील परकीयांचे आधिपत्य पूर्णपणे संपुष्टात आले. त्याच्या काळात उत्तर भारतात एकसंधता आणि एकात्मिता निर्माण झाली.
चंद्रगुप्ताने विक्रमादित्य हे नाव धारण केले. चंद्रगुप्ताच्या काळातील अनेक सुवर्ण, चांदी आणि तांब्याची नाणी उपलब्ध आहेत. त्याच्या कारकिर्दीत समाजाला स्थैर्य प्राप्त झाल्यामुळे शास्त्र, कला, संस्कृती, व्यापार आणि स्थापत्यशास्त्र व कला इत्यादींना उत्तेजन मिळाले आणि त्यांची भरभराट झाली. याच काळात हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन झाले. कालिदासासारखा महाकवी, विशाखदत्तासारखे वाङ्मयकार, धन्वंतरी हे जीवशास्त्राचे तज्ज्ञ, आर्यभट्ट व वराहमिहीर यांच्यासारखे गणितज्ज्ञ तसेच इतर अवकाश शास्त्रज्ञ अशा विद्वानांना चंद्रगुप्त (विक्रमादित्य) आणि त्यानंतरच्या राजांनी आश्रय दिला. समुद्रगुप्ताच्या कारकिर्दीत सुरू झालेले सुवर्णयुग विक्रमादित्य, कुमारगुप्त आणि स्कंधगुप्त यांच्या कारकिर्दीपर्यंत चालू राहिले. गुप्त साम्राज्याला प्राचीन भारताचे सुवर्णयुग असे मानले जाते. फाहिएन नांवाचा एक चीनचा विद्वान पर्यटक बौद्ध धर्माच्या अभ्यास व संशोधनासाठी चंद्रगुप्ताच्या राज्यकालात गुप्त साम्राज्यात तीन वर्षे राहून गेला. त्याने गुप्तकालीन राजकीय, धार्मिक आणि सामाजिक परिस्थितीवर बऱ्याच नोंदी केल्या.
संदर्भ :
- Reddy, Krishna, Indian History, New Delhi, 2017.
- Thaper, Romila, History of India, vol.1, New Delhi, 1966.
- कदम, य. ना. समग्र भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००३.
समीक्षक – सु. र. देशपांडे
- 177,455 अभ्यागत
Comments
Post a Comment